
नमस्कार वाचकहो,
काळापासून वेध घेणार आहे. सुरुवात पायापासून करावी असे म्हणतात त्याप्रमाने मराठी साम्राज्याचा पाया ज्यांनी घातला त्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांच्याबद्दल थोडे लेखन करणे अगत्याचे ठरते. तेव्हा त्या अखिल महाराष्ट्रासाठी साक्षात देवतुल्य असणार्या शिवछत्रपतींनाच साकडे घालून मराठ्यांच्या इतिहासाचे सप्रमाण लेखन करण्याचा प्रयत्न करणार आहे. अलिकडच्या काळांत कित्येक नवनवी साधने नित्यनेमाने समोर येत आहेत. पूर्वीच्या लेखकांचे संशोधन हळूहळू कालबाह्य होते आहे. अशा वातावरणात मराठी माणूस भांबावून गेला तर आश्चर्य वाटायला नको. या ब्लॉगवर लेखन करताना मला या गोष्टीची पुरेपुर जाणीव आहे की मराठ्यांच्या खर्या इतिहासाचा तटस्थ शोध ही एक दीर्घकालीन संशोधनाची प्रक्रिया आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून मी वाचकांना जो इतिहास माहिती आहे त्याबद्दल अजिबात सांगणार नाहीये. त्याचा केवळ आवश्यक उल्लेख करुन वाचकांना अज्ञात असलेला इतिहास वाचकांच्या समो
र आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. माझे वैयक्तीक छंद अनेक आहेत त्यामुळे या ब्लॉगवर लेख किती सातत्याने येतील याबद्दल मलाही शंका आहेच, पण मराठ्यांचा इतिहास हा माझा आता जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे व त्या अनुषंगाने नियमित लेखन करणार आहे.

या ब्लॉगच्या माध्यमातून मी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संक्षेपात मांडणार आहेच. पण ब्लॉगवरील लेखनाची सांगता प्रत्यक्ष शिवछत्रपतिंच्या सविस्तर इतिहासाने करणार आहे. त्यामुळे या ब्लॉगवर कोणत्या क्रमाने लेखन करणार आहे ते आधी सांगतो. -
१. छत्रपती शिवाजी महाराजांनी भावी मराठी साम्राज्याचा पाया घातला
२. पेशवाईचा उगम
३. मराठी साम्राज्याची शान - पहिला पेशवा बाजीराव
४. बाजीराव पेशव्यांनंतरचे इतर सर्व पेशवे व त्यांच्या कारकीर्दी
५. पानिपत युद्धाची चाहूल
६. पानिपत युद्ध होणारच नव्हते?
७. अखेर पानिपत झाले...
८. पानिपत युद्धाचे खरे मोहरे आणि खोट्या मोहरा
९. मराठी साम्राज्याचा अस्त - पेशवाईची अखेर
१०. इंग्रजी साम्राज्याचा युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकला
तूर्तास एवढे पुरे. सध्या फक्त संकल्प सोडला आहे. आता मुद्देसूद अभ्यास सुरु करतो आहे. अभ्यास होताच एकेक लेख प्रकाशित करायला सुरुवात करेन. माझ्यासमोर आदर्श तसा पाहिला तर कोणाचाच नाही. कारण आदर्श ठेवला की संशोधनाची दिशा गढूळ होते असे मला वाटते.
पण काही नावे आवर्जून घेतलीच पाहिजेत,
नरहर कुरुंदकर , भारताचार्य म्हणून गौरविले गेलेले चिं.वि.वैद्य, रियासतकार म्हणून गौरविले गेलेल्या गो.स.सरदेसाई, त्र्यं.शं. शेजवलकर, ना. वि. बापट, इत्यादी विद्वानांनी आजच्या संशोधकांचे कष्ट काही प्रमाणात तरी हलके केलेले आहेत.
त्याबद्दल तरी या संशोधकांचे ऋण मानून आणि छत्रपति शिवाजी महाराजांचे स्मरण करुन माझा लेखनयज्ञ सुरु करतो ...
धन्यवाद,
~सागर~

No comments:
Post a Comment